Uncategorized

अहेरीत ३० हेक्टर राखीव वनभूमी अतिक्रमणमुक्त; वनविभागाची धडक कारवाई

अहेरी : वनपरिक्षेत्रांतर्गत राखीव वनक्षेत्रावर करण्यात आलेले तब्बल ३० हेक्टर अतिक्रमण वनविभागाने धडक कारवाई करत हटविले. वन आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने अनेक जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही मोहीम यशस्वीरीत्या राबविली. या कारवाईमुळे अतिक्रमणकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भविष्यात वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा वनविभागाने दिला आहे.

अहेरी वनपरिक्षेत्रातील खमनचेरू उपक्षेत्रांतर्गत नियतक्षेत्र तानबोडी येथील राखीव वन कक्ष क्रमांक १२ मध्ये काही नागरिकांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वनजमिनीवर अतिक्रमण करून ती शेतीसाठी वापरात आणली होती. याची दखल घेत मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जी. पी. नरवणे, उपवनसंरक्षक दीपाली तलमले आणि उपविभागीय वनाधिकारी एस. जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली.

अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. डी. इंगळे, आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी. जी. गणवीर, पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. टी. चौके, नायब तहसीलदार प्रतिक आढाव तसेच अहेरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षल एकरे यांच्या उपस्थितीत वन व पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. या मोहिमेत वनरक्षक, वनपाल आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता.

जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमित क्षेत्र मोकळे करण्यात आले असून वनजमिनीचे मूळ स्वरूप पुन्हा बहाल करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे वनजमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. भविष्यात अशा प्रकारचे अतिक्रमण आढळल्यास संबंधितांविरुद्ध याच पद्धतीने कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी एन. डी. इंगळे यांनी दिला आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.