जिल्हा ताज्या बातम्या

रेड अलर्टचा इशारा! चंद्रपूर-गडचिरोलीतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

गडचिरोली : विदर्भात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून २९ जुलै रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंगळवार, २९ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, आश्रमशाळा, आयटीआय तसेच व्यावसायिक प्रशिक्षण संस्था बंद राहणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही रेड अलर्टमुळे शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.