अहेरी : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आत्मसमर्पित माओवादी सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन सभागृहात भव्य जनजागरण व पुनर्वसन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आत्मसमर्पणानंतर मुख्य प्रवाहात येताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, कागदपत्रांची पूर्तता करणे तसेच रोजगार व कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. रमेश, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हर्षवर्धन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) सुनील मोहिते, अहेरी उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत चांदेवार, जिमलगट्टा उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मडावी, सिरोंचा उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी, आत्मसमर्पित माजी माओवादी सदस्य व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले की, २००५ पासून शासनाने माओवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली असून, आतापर्यंत ८६१ माओवादी या योजनेचा लाभ घेत मुख्य प्रवाहात आले आहेत. आत्मसमर्पित सदस्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासोबतच आवश्यक ओळखपत्रे व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी अहेरी उपविभागीय स्तरावर या जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आत्मसमर्पण केलेल्या अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वीप्रमाणे भीतीचे वातावरण राहिलेले नसून, आत्मसमर्पित सदस्य आणि पोलीस प्रशासन यांच्यात विश्वासाचे व सहकार्याचे संबंध निर्माण व्हावेत, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्य प्रवाहात सन्मानाने जगण्यासाठी हा मेळावा एक सुरुवात असून, जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने चकमकीदरम्यान किंवा इतर ठिकाणी पोलिसांकडून लुटलेली अथवा पुरून ठेवलेली शस्त्रे याबाबत माहिती देणाऱ्यांसाठी बक्षिसाची योजना जाहीर केली असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. माहिती मिळाल्यानंतर २४ तासांत बक्षीस देण्याची तरतूद असून, माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यात आत्मसमर्पित माजी माओवादी सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध शासकीय सेवा, पुनर्वसन योजना, कागदपत्रांची पूर्तता आणि वैद्यकीय तपासणी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली. आत्मसमर्पणानंतर शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी, प्रलंबित प्रकरणे, कागदपत्रांची पूर्तता तसेच जमीन वाटपाशी संबंधित प्रश्नांची नोंद घेण्यात आली. संबंधित विभागांशी तातडीने समन्वय साधून हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आभा कार्डचे वितरण करण्यात आले. मेळाव्यामुळे आत्मसमर्पित सदस्यांना शासनाच्या पुनर्वसन योजनांची माहिती, विविध सेवांचा प्रत्यक्ष लाभ आणि प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.










