जिल्हा • ताज्या बातम्या • महाराष्ट्र

ताटीगुडम येथे उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता चाचणी संपन्न

ताटीगुडम : अहेरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ताटीगुडम येथे उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या चाचणीला एकूण ७० परीक्षार्थी उपस्थित होते. त्यामध्ये ३८ महिला आणि ३२ पुरुषांचा समावेश होता.

या चाचणीच्या माध्यमातून सहभागी व्यक्तींच्या वाचन, लेखन, अंकज्ञान आणि मूलभूत गणितीय कौशल्यांचे मूल्यमापन करण्यात आले. दैनंदिन जीवनातील व्यवहार सुलभ व्हावेत, साक्षरतेचे महत्त्व नागरिकांना समजावे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

चाचणीदरम्यान सहभागी महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिक्षकांनी परीक्षार्थींना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले. ग्रामीण तसेच आदिवासी भागातील प्रत्येक व्यक्ती साक्षर होऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावी, यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

‘साक्षरतेकडे वाटचाल, उज्ज्वल भविष्याची सुरुवात!’ या संदेशातून साक्षरतेचा प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले. समाजात शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करून साक्षर आणि सक्षम समाज घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. सदर चाचणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ताटीगुडम, केंद्र राजाराम, तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली येथे घेण्यात आली.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.