अहेरी, दि. १५ ऑक्टोबर : नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विद्युत कामांच्या मोबदल्यात ठेकेदाराकडे तीन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहेरीत सापळा रचला. अहेरी नगरपंचायतीचे भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल विलासराव गुडेलीवार (वय ४०) यांना त्यांच्या हार्डवेअर दुकानात एक लाख २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विभागाने दिली.
तक्रारदार हे ३३ वर्षीय परवानाधारक इलेक्ट्रिकल ठेकेदार असून, त्यांच्या मित्राच्या ठेकेदारी फर्मला नगरोत्थान योजना २०२५–२६ अंतर्गत अहेरीतील प्रभाग क्रमांक १ ते १० आणि प्रभाग क्रमांक ११ ते १७ मध्ये अतिरिक्त सर्व्हिस केबल टाकण्याची कामे मिळाली होती. या दोन्ही कामांची एकूण मंजूर निविदा रक्कम १९ लाख ८७ हजार ७६५ रुपये होती. तक्रारदारांनी मित्रासोबत करार करून संबंधित कामे पूर्ण केली होती. निर्धारित १८० दिवसांच्या मुदतीत कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांची बिलेही अदा करण्यात आली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालानुसार, ही कामे जिल्हा नियोजन समितीतून आपण मंजूर करून आणली असून ती आपल्या कोट्यातील असल्याचा दावा गुडेलीवार यांनी केल्याचा आरोप आहे. या कामांच्या बिलांच्या १५ टक्के रकमेप्रमाणे तीन लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी ठेकेदाराकडे केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या मागणीपोटी ५ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदारांनी ३० हजार रुपये रोख दिले होते. मात्र, त्यानंतरही व्हॉट्सॲप कॉलद्वारे उर्वरित दोन लाख ७० हजार रुपयांसाठी तगादा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वारंवार होणाऱ्या लाच मागणीला कंटाळून तक्रारदारांनी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, १५ ऑक्टोबर रोजी पंचांच्या उपस्थितीत मागणीची पडताळणी करण्यात आली. तक्रारदारांना ध्वनिमुद्रकासह गुडेलीवार यांच्या हार्डवेअर दुकानात पाठविण्यात आले. यावेळी उर्वरित दोन लाख ७० हजार रुपयांची मागणी करून सध्या उपलब्ध असलेली रक्कम आणून देण्यास सांगितल्याचे विभागाच्या अहवालात नमूद आहे. तक्रारदारांनी एक लाख २० हजार रुपये उपलब्ध असल्याचे सांगितल्यानंतर ती रक्कम दुकानात आणण्यास सांगण्यात आले.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार पंचांसह लाचेची रक्कम घेऊन दुकानात गेले. गुडेलीवार यांनी एक लाख २० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे विभागाने स्पष्ट केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही अहवालात नमूद आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक दिंगबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत करपे यांच्यासह संजयकुमार बोहरे, मंगेश कहालकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे आणि दीपक बाटबर्वे यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी माहिती किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










