अहेरी : ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासह शाळांमधील व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अहेरीचे गटशिक्षणाधिकारी सुरज वागस्कर यांनी शाळांच्या अचानक तपासणीची मोहीम सुरू केली आहे. १३ ऑक्टोबर रोजी त्यांनी पेरमिली केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडपल्ली आणि भगवंतराव हायस्कूल, पेरमिली येथे भेट देऊन शैक्षणिक स्थिती, पोषण आहार, स्वच्छता आणि भौतिक सुविधांची पाहणी केली. त्यांच्या अनपेक्षित भेटीमुळे शालेय वर्तुळात चांगलीच धावपळ उडाली.
अधिकारी म्हणून केवळ निरीक्षण न करता वागस्कर यांनी शिक्षकाची भूमिका बजावत स्वतः वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि ज्ञानपातळीचा आढावा घेतला. पायाभूत अंकगणित, पाढे आणि अक्षरओळख यांसारख्या मूलभूत कौशल्यांवर विशेष भर देण्याचे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी अध्यापनात सातत्य आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यानंतर भगवंतराव हायस्कूल, पेरमिली येथे भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची स्थिती जाणून घेतली. यावेळी शाळेतील शालेय पोषण आहाराचा साठा व गुणवत्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, क्रीडांगण आणि इतर भौतिक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत, तसेच शैक्षणिक वातावरण समाधानकारक आहे की नाही, याची त्यांनी बारकाईने तपासणी केली.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण आणि बौद्धिक विकास हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे, असे स्पष्ट करत वागस्कर यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचे निर्देश दिले. तालुक्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शाळांच्या अचानक तपासणीची मोहीम नियमितपणे सुरू राहणार असून, शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या उपक्रमामुळे शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यवस्थापन सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.










