आलापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पक्षाच्या फलकांचे अनावरण करण्यात आले. आलापल्ली शहरात प्रथमच अशा स्वरूपात पक्षाचे फलक लावण्यात आल्याने स्थानिक शिवसैनिक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच युवा सेनाप्रमुख आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दिलीप भाऊ सुरपाम यांच्या उपस्थितीत शहरातील विविध ठिकाणी पक्षाच्या फलकांचे अनावरण करण्यात आले.
आलापल्ली शहर व परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच जनसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने कार्यरत राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या फलक अनावरण कार्यक्रमाला विभागप्रमुख सचिन सलामे, आकाश तुमडे, संजय फुलोर, राकेश आत्राम, सागर गोंगले, तिरुपती रामगिरवार, व्यंकटेश बंदूकवार, विजय वानखेडे, वसंत आलाम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.










