जिल्हा

नन्हे सितारे विभागीय स्पर्धेत लोक बिरादरीचे सात विद्यार्थी चमकले

भामरागड : आदिवासी विकास विभागांतर्गत ओपन लिंक फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘नन्हे सितारे’ उपक्रमाच्या विभागीय स्पर्धेत लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. ३० सप्टेंबर २०२६ रोजी शासकीय आश्रमशाळा, कवडस, ता. हिंगणा, जि. नागपूर येथे झालेल्या या स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड अंतर्गत लोक बिरादरी आश्रमशाळेचे आठ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी तब्बल सात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवत आपल्या शाळेचा नावलौकिक वाढविला.

आदिवासी विद्यार्थ्यांमधील इंग्रजी संवादकौशल्य, आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सार्वजनिक सादरीकरणाची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने ‘नन्हे सितारे’ उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर विभागातील विविध एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधून इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक प्रकल्पातून ११ ‘नन्हे सितारे’ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आपली कला व प्रतिभा सादर करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. त्याच उपक्रमांतर्गत कवडस येथे विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

लोक बिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता पहिली ते तिसरी गटात कथा सादरीकरणात समीक्षा नितीन मायनाळे हिने तृतीय, तर कविता सादरीकरणात अनन्या बाबुराव कोंडागुर्ले हिने तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता चौथी ते पाचवी गटात कथा सादरीकरणात कार्तिक प्रकाश सोयाम याने प्रथम, स्पोकन इंग्लिशमध्ये काव्यांजली दशरथ कोरेत हिने प्रथम, कविता सादरीकरणात शर्मिला मूरा आत्राम हिने द्वितीय, तर स्पेलिंग बीमध्ये नविना राजू कुरसामी हिने तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता सहावी ते आठवी गटात कविता सादरीकरणात तनुजा सुधाकर तोप्पा हिने प्रथम क्रमांक पटकावला.

या यशाबद्दल प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सुरेश गुट्टेवार, तुषार कापगते, विजया किरमिरवार, हिना गुट्टेवार, निर्मला सिडाम, रंजना सडमेक व मोनिका येजुलवार यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्याध्यापक गिरीष कुलकर्णी, शरीफ शेख तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा तसेच भामरागड आदिवासी विकास प्रकल्पाच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीला नवी झळाळी मिळाली आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.