जिल्हा ताज्या बातम्या

‘आदिवासी रूट्स अँड रेसिपी’तून शेकडो महिलांना रोजगाराचा आधार

आलापल्ली : दुर्गम व आदिवासी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांच्या पारंपरिक कौशल्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मियाम चॅरिटेबल ट्रस्टने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. ट्रस्टच्या सर्वेसर्वा नितू जोशी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘आदिवासिया – रूट्स अँड रेसिपी’ या उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो आदिवासी महिलांना पारंपरिक खाद्यपदार्थ निर्मितीचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आलापल्ली येथील भव्य मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘रेसिपी प्रदर्शनाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनातून दुर्गम भागातील महिलांनी तयार केलेल्या पारंपरिक व पौष्टिक खाद्यपदार्थांची शहरी बाजारपेठेशी ओळख करून देण्यात आली. महिलांनी तयार केलेले विविध प्रकारचे लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळे तसेच स्थानिक मसाल्यांसह विविध पारंपरिक खाद्यपदार्थ प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

आदिवासी भागातील पारंपरिक खाद्यपदार्थांना नैसर्गिक चव, पौष्टिकता आणि घरगुतीपणामुळे मागणी वाढत आहे. मात्र, योग्य मार्गदर्शन, पॅकेजिंग आणि बाजारपेठेच्या अभावामुळे या पारंपरिक उत्पादनांना व्यापक व्यावसायिक संधी मिळत नव्हती. ही बाब लक्षात घेऊन मियाम चॅरिटेबल ट्रस्टने महिलांना पदार्थ निर्मितीबरोबरच स्वच्छता, आकर्षक पॅकेजिंग, उत्पादनाचे सादरीकरण आणि विक्री व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांच्या पारंपरिक कौशल्याला व्यावसायिक स्वरूप मिळण्यास मदत होत आहे.

“दुर्गम भागातील महिलांमध्ये प्रचंड कौशल्य आणि मेहनत करण्याची तयारी आहे. गरज आहे ती केवळ त्यांना योग्य दिशा आणि संधी देण्याची,” असा विश्वास ट्रस्टच्या सर्वेसर्वा नितू जोशी यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे अनेक महिलांना स्वतःच्या कौशल्यातून उत्पन्न मिळविण्याची संधी निर्माण झाली असून, त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीलाही हातभार लागत आहे. पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन करत महिलांना रोजगार व स्वावलंबनाची दिशा देणाऱ्या मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.