गडचिरोली : मॉडर्न एज्युकेशन सोसायटीतर्फे २५ एप्रिल २०२६ रोजी राणी दुर्गावती कन्या शाळेत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत (MTS) भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा, राजाराम (खां) येथील इयत्ता आठवीचा विद्यार्थी देव मधुकर गोंगले याने जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले.
देव हा सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असून त्याला आई लताबाई मधुकर गोंगले व वडील मधुकर गोंगले यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्याचे वडील राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत. देवच्या शैक्षणिक वाटचालीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीचे शिक्षक रामदास उघाडे यांनी गणित विषयाचे भक्कम मार्गदर्शन केले. त्यानंतर जि. के. मडावी सर यांनीही गणित विषयात सातत्याने मार्गदर्शन केले. गणित हा देवचा आवडता विषय असून त्याने या विषयात नेहमीच चांगली कामगिरी केली.
देवने आपल्या यशाचे श्रेय आपल्या गुरुजनांसह मार्गदर्शक इंदाराम येथील मामा इम्रानखान पठाण आणि फरीन इम्रानखान पठाण यांना दिले आहे. सुख-दुःखाच्या प्रसंगी साथ देण्याबरोबरच अभ्यासाबाबत सातत्याने मार्गदर्शन केल्याबद्दल त्याने त्यांचे विशेष आभार मानले. तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळेतील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचाही आपल्या यशात मोठा वाटा असल्याचे त्याने सांगितले.
त्यानंतर देवने भगवंतराव माध्यमिक तथा प्राथमिक आश्रमशाळेत इयत्ता आठवीत प्रवेश घेतला. येथे गणित विषयाचे वर्गशिक्षक सुदर्शन वासाडे यांनी त्याला नियमित गृहपाठ व सराव देत मार्गदर्शन केले. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असलेल्या वासाडे सरांनी दिलेला गृहपाठ देवने कर्तव्यपूर्वक पूर्ण केला. त्यामुळे त्याच्या गणित विषयातील अभ्यासाला अधिक चालना मिळाली.
देवच्या या यशाबद्दल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक टी. सी. ओड्नलवार, सर्व शिक्षक, आई-वडील तसेच ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर ग्रामीण व आश्रमशाळेतील विद्यार्थीही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवू शकतात, हे देव गोंगलेच्या यशातून अधोरेखित झाले आहे.










