Uncategorized

१९,०२४ फूट उंचीवर नेणार शिवमूर्ती; गडचिरोलीच्या युवकांसाठी प्रेरणादायी संकल्प

आल्लापल्ली, दि. २१ सप्टेंबर २०२६ : गडचिरोली जिल्ह्याचे नाव देशभर पोहोचविण्यासोबतच जिल्ह्यातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी धाडसाने पुढे जावे, या उद्देशाने आल्लापल्ली येथील वैभव ज्योती विजय कोमलवार यांनी आल्लापल्ली ते लेह-लडाखमधील उमलिंग ला (१९,०२४ फूट) असा सोलो बाईक प्रवास सुरू केला आहे. सुमारे ५,५०० किलोमीटरचा हा प्रवास २१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

या प्रवासाचे विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील १६ गड-किल्ल्यांची माती आणि पाणी एकत्र करून साकारलेली शिवाजी महाराजांची मूर्ती. ही मूर्ती उमलिंग ला येथील सुमारे १९,०२४ फूट उंचीवर नेण्याचा प्रयत्न कोमलवार करणार आहेत. या संकल्पासाठी त्यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील १६ गड-किल्ल्यांना भेट देऊन तेथील माती व पाणी संकलित केले होते.

या उपक्रमासाठी कोमलवार यांना कुटुंबीयांचा आशीर्वाद लाभला असून, माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. जिल्हाधिकारी अविशांत पांडा तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक रमेश कुमार यांनीही या साहसी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. वैयक्तिक स्वप्नपूर्तीबरोबरच गडचिरोलीच्या युवकांना प्रेरणा देणे आणि जिल्ह्याची ओळख देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे हा या प्रवासामागील मुख्य उद्देश आहे.

दरम्यान, २१ सप्टेंबर रोजी पहाटे ७ वाजता आल्लापल्ली येथील नागरिक, शिक्षक, सरपंच, आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत या सोलो बाईक राईडला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. शुभेच्छांच्या वर्षावात वैभव कोमलवार यांनी लेह-लडाखच्या दिशेने प्रवास सुरू केला. “आपणही काहीतरी वेगळे करू शकतो” हा आत्मविश्वास गडचिरोलीच्या युवकांमध्ये निर्माण व्हावा, मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, हाच या उपक्रमाचा संदेश आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.