गडचिरोली : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर १ ते ८ डिसेंबरदरम्यान गडचिरोली ते नागपूर विधान भवन असा तब्बल १७५ किलोमीटरचा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी संघर्ष कृती समिती आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, दोन्ही जिल्ह्यांतील जनतेच्या विविध प्रश्नांसाठी शासनदरबारी आवाज बुलंद करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये विमानतळ, एमआयडीसी, समृद्धी महामार्ग आदी विकास प्रकल्पांसाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन संमतीनेच प्रक्रिया राबविणे, जबरदस्तीने जमीन अधिग्रहण थांबविणे, गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देणे, धानाला बोनस जाहीर करणे तसेच सौर कृषिपंप, ऐच्छिक वीजजोडणी आणि २४ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द कालव्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण करून अधिकाधिक गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात येणार आहे.
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत वाघ व रानटी हत्तींच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जीव जात असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, हल्ल्यांत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी मोर्चातून मांडली जाणार आहे. तसेच वन्य हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणीही निवेदनात समाविष्ट आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किमान दोन अत्याधुनिक मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे.
यासोबतच जड वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे, दुर्गम भागांतील खराब रस्त्यांची दुरुस्ती करणे, वनहक्क पट्टेधारकांचे प्रलंबित दावे तातडीने निकाली काढणे आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावणे, अशा विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून शासनासमोर मांडण्यात येणार आहेत. हिवाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकरी, शेतमजूर आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळावे, यासाठी हा पायी मोर्चा महत्त्वपूर्ण ठरणार असून शासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.













