जिल्हा

अतिदुर्गम वांगेतुरीत आरोग्यसेवेचा आधार; पोलीस व विविध संस्थांच्या संयुक्त शिबिराला प्रतिसाद

गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोस्टे वांगेतुरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गडचिरोली पोलीस दल, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद, केंद्रीय राखीव पोलीस बल (सीआरपीएफ) आणि शालिनी मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात सुमारे १७० नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच गरजेनुसार नागरिकांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले.

 

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात शालिनी मेघे रुग्णालयाचे जनरल फिजिशियन डॉ. प्रदीप जोशी, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सारंग डोंगरे व डॉ. प्रांजल नागोसे यांच्यासह नर्सिंग स्टाफने वैद्यकीय सेवा दिली. यावेळी नागरिकांना विविध आजार, नेत्रविकार आणि पोषणविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गंभीर स्वरूपाच्या आरोग्य समस्या असलेल्या २० नागरिकांना पुढील तपासणी व उपचारांसाठी विविध रुग्णालयांत जाण्याची शिफारस करण्यात आली.

 

गडचिरोली पोलीस दलाने सन २०२१ पासून आजपर्यंत २२६ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. तसेच सहा रक्तदान शिबिरांतून ४,८६४ युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत ९,९७१ पेक्षा अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करून १,४१२ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याशिवाय शिबिरस्थळी फिरती प्रदर्शनी व बॅनरच्या माध्यमातून जिल्ह्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान, सी-६० जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

 

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी.जे. तसेच सहायक पोलीस अधीक्षक सागर भामरे यांचे मार्गदर्शन लाभले. पोस्टे वांगेतुरीचे पोलीस निरीक्षक विश्वास पुल्लरवार, सीआरपीएफ १९१ बटालियनचे असिस्टंट कमांडंट मनोज कुमार, पोलीस निरीक्षक जितेंद्र कुमार आणि वांगेतुरी पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देणारा हा उपक्रम पोलीस दलाच्या सामाजिक बांधिलकीचे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरला.

फॉलो करा.

मुख्य संपादक : प्रशांत रागीवार

वृत्त संपादक : करण मेश्राम

वृत्त संपादक : संकल्प दुर्गे

News Reporter
error: कृपया बातमी कॉपी करू नये.