जिल्हा

जनजातीय गौरव दिनाच्या देशस्तरीय सोहळ्याचे यजमानपद गडचिरोलीकडे

गडचिरोली : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोली येथे १३ ते १५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या देशस्तरीय मुख्य शासकीय सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार असून, राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सुमारे आठ ते बारा हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ४ नोव्हेंबर रोजी घेतला. राज्यभरातून सुमारे १,२०० कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

महोत्सवाच्या व्यवस्थेसाठी प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. कलाकारांची निवास व भोजनव्यवस्था, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी आणि अखंडित वीजपुरवठा यांचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधानांचा ऑनलाइन सहभाग लक्षात घेता बीएसएनएल आणि एनआयसीला उच्चगती इंटरनेट व दृकश्राव्य यंत्रणेची पूर्वचाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यक्रमस्थळी महिलांसाठी ५० व पुरुषांसाठी ५० अशी एकूण १०० फिरती शौचालये, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा आणि पर्यायी वीजव्यवस्था उपलब्ध राहणार आहे. नागरिकांच्या प्रवासासाठी अतिरिक्त एसटी बससेवाही सुरू ठेवण्यात येणार आहे.

भगवान बिरसा मुंडा गौरव दिवसानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान राज्यभर सेवा सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. ११ व १२ नोव्हेंबरला जिल्हा व अनुसूचित जमातीबहुल तालुका मुख्यालयांत पत्रकार परिषदा, १३ नोव्हेंबरला पात्र लाभार्थ्यांना धनादेश व योजनांचे लाभवाटप, तर १४ नोव्हेंबरला आदिवासी स्मारकांची स्वच्छता, दीपोत्सव आणि भगवान बिरसा मुंडा आदिवासी सेवक पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबरला राज्यभर आदिवासी महापुरुषांना अभिवादन करून सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा सन्मान करण्यात येईल.

सेवा सप्ताहाच्या पुढील टप्प्यात आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबरला आधार कार्ड, वनपट्टे, शेतकरी नोंदणी आणि शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांबाबत विशेष सेवा शिबिरे आयोजित केली जातील. १७ नोव्हेंबरला रक्तदाब, मधुमेह, सिकलसेल तसेच माता-बाल आरोग्य तपासणी व पोषणविषयक जनजागृती करण्यात येईल. १८ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, जात वैधता प्रमाणपत्र, स्पर्धा परीक्षा, तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रमाच्या सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण कराव्यात व प्रत्यक्ष पूर्वतपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.