जिल्हा • ताज्या बातम्या

आश्रमशाळेच्या वर्गखोलीतून डॉक्टरेटपर्यंत; कमलापूरच्या सुपुत्राची ऐतिहासिक भरारी!

अहेरी : निसर्गसंपन्न आणि आदिवासी संस्कृतीची ओळख असलेल्या कमलापूर गावाने आता शैक्षणिक क्षेत्रातही मानाचा तुरा रोवला आहे. गावातील भूमिपुत्र प्रा. सत्यनारायण पुसाला यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून प्राणिशास्त्र विषयात पीएच.डी. (आचार्य) पदवी संपादन केली आहे. विशेष म्हणजे, कमलापूर गावातील पहिले एम.एस्सी. पदवीधर ठरल्यानंतर आता पहिले डॉक्टरेटधारक होण्याचा बहुमानही त्यांनी मिळविला आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती आणि संघर्षावर मात करून मिळविलेल्या या यशामुळे गावाच्या शैक्षणिक इतिहासात नवा अध्याय जोडला गेला आहे.

डॉ. सत्यनारायण पुसाला यांच्या संशोधनाचा विषय मध्य भारतातील कॅटफिश जैवविविधता, डीएनए बारकोडिंग आणि आण्विक वंशविकास (Molecular Phylogeny) असा होता. आधुनिक आण्विक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी हे संशोधन पूर्ण केले. त्यांना डॉ. मंदार एस. पैगणकर यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या ते शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित मोहसीनभाई झवेरी महाविद्यालय, देसाईगंज (वडसा) येथे प्राणिशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात कमलापूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या श्री गुरुदेव आश्रमशाळेतून झाली. आश्रमशाळेतील शिक्षणाचे संस्कार आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी उच्च शिक्षणाची वाटचाल यशस्वी केली. राज्यातील एकमेव शासकीय हत्तीकॅम्प, रानम्हशींचे अस्तित्व, दुर्मिळ गिधाडांचा अधिवास आणि समृद्ध वनसंपदा यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कमलापूरला आता शैक्षणिक क्षेत्रातही नवी ओळख मिळाली आहे. त्यांच्या या यशामागे आई-वडील, भाऊ, पत्नी, शिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र अरेकर, सहकारी प्राध्यापक आणि मित्रपरिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात जन्माला येऊनही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उच्च शैक्षणिक शिखर गाठता येते, हे डॉ. सत्यनारायण पुसाला यांनी सिद्ध केले आहे. त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या आचार्य पदवीमुळे कमलापूर गावाची मान उंचावली असून, गावातील नव्या पिढीला उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.