जिल्हा ताज्या बातम्या

गडचिरोलीच्या शेतकऱ्यांसाठी उद्या कृषी विद्यापीठाची खरीप शिवार फेरी

गडचिरोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवार फेरीत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बंधू-भगिनींसाठी सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या शिवार फेरीचे उद्घाटन २० सप्टेंबर रोजी राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होत आहे.

या शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेले विविध पीक वाण, आधुनिक लागवड तंत्रज्ञान आणि कृषी संशोधनाची प्रत्यक्ष माहिती घेता येणार आहे. विशेष प्रात्यक्षिक क्षेत्रात सुमारे २५ एकरांवर २२८ विविध पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशींची प्रात्यक्षिके मांडण्यात आली आहेत. यामध्ये तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस, चारा पिके, भाजीपाला आणि फुलपिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे.

याशिवाय विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागांचे सुमारे ३,२०० हेक्टर प्रक्षेत्र तसेच सुमारे २ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचा पैदासकार बियाणे उत्पादन कार्यक्रम शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. या उपक्रमात राज्यातील चारही कृषी विद्यापीठांसह कृषी विभाग, आत्मा, महाबीज, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि विविध संस्थांचा सहभाग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कृषी संशोधन, सुधारित बियाणे आणि शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.

शिवार फेरीदरम्यान आयोजित चर्चासत्रांमधून शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधता येणार असून, शेतीविषयक शंकांचे निरसन करून घेण्याची संधी मिळणार आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सुधारित पीक वाण, आधुनिक लागवड पद्धती आणि शेतीपूरक व्यवसायांची माहिती जाणून घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बंधू-भगिनींनी सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी या खरीप शिवार फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ किशोर झाडे यांनी केले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.