जिल्हा ताज्या बातम्या

शिवनी बस अपघातातील ३८ प्रवाशांवर उपचार; ७ जणांना गंभीर दुखापती, जीवितहानी टळली

गडचिरोली : शिवनीजवळ झालेल्या बस अपघातातील जखमी प्रवाशांना योग्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवावे, असे निर्देश सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि गावंडे यांच्याकडून अपघातातील जखमी प्रवाशांच्या प्रकृतीची आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

शिवनीजवळ झालेल्या या बस अपघातातील एकूण ३८ प्रवाशांना उपचार व वैद्यकीय तपासणीसाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी ७ प्रवाशांना उपचारांची आवश्यकता असलेल्या दुखापती झाल्या असून, ३१ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमी प्रवाशांना आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच सामान्य रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्यात आली. जखमी प्रवाशांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून आवश्यक उपचार केले. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने तत्परतेने कार्यवाही करत जखमींना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली.

दरम्यान, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी जखमींच्या उपचारांबाबत माहिती घेत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत होणाऱ्या बदलांवर सातत्याने लक्ष ठेवावे, तसेच त्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवनी बस अपघातातील ३८ प्रवाशांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.