सिरोंचा : येथील पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित विविध कार्यक्रमांचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. विद्यार्थ्यांसह नागरिकांना विविध शासकीय सेवा, योजना आणि सुविधांची माहिती मिळावी तसेच त्यांचा प्रत्यक्ष लाभ घेता यावा, या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अजय सुकंदरवार होते. यावेळी गटविकास अधिकारी सुखीराम कस्तुरे, नायब तहसीलदार नरेंद्र हलामी, गटशिक्षणाधिकारी किशोर चव्हाण, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल राऊत, मंडळ कृषी अधिकारी सपना राहसे, आयसीडीएसच्या वैशाली कोल्हे, भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक हर्षवर्धन डिकीकर, मंडळ अधिकारी वैद्य, केंद्रप्रमुख कृष्णारेड्डी सोमनपल्ली तसेच मुख्याध्यापक मरस्कोल्हे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणातून तहसीलदार अजय सुकंदरवार यांनी कृषी, आरोग्य आणि शिक्षण हे समाजाच्या विकासाचे मूलभूत घटक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आवश्यक शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. विशेषतः जातीचे दाखले आणि अधिवास प्रमाणपत्रे वेळेत मिळवणे भविष्यातील शिक्षण, शिष्यवृत्ती तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह नागरिकांना विविध शासकीय सेवा, योजना आणि विभागांच्या सुविधांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. वाय. जगदाभी यांनी केले, तर रामगोपाल अट्टेला यांनी उपस्थितांचे आभार मानले.










