गडचिरोली : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गणेशोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम’ समाजकल्याण विभागाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ‘आपली कला, आपली संस्कृती, आपली ओळख आणि आपला अभिमान’ या भावनेतून आयोजित या कार्यक्रमात कला, संस्कृती, श्रद्धा आणि एकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात भावपूर्ण गणेश आरतीने करण्यात आली.
यानंतर स्थानिक कलाकारांनी विविध कलाविष्कार सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. प्रतीक भाईसारे याने ‘सूर निरागस’ या लोकप्रिय भक्तिगीतावर सादर केलेल्या सोलो नृत्याला उत्स्फूर्त दाद मिळाली. श्री गुरुदेव स्वरसाधना भजन मंडळ, गडचिरोली यांच्या भक्तिमय भजनांनी सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. चिमुकली साहित्या हिने ‘हे धरती हे अंबर तुझे गुण गाती’ या गीतावर सादर केलेल्या मनमोहक नृत्यानेही उपस्थितांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमात सनराईज गरबा क्लास, गडचिरोली यांच्या चमूने सादर केलेल्या उत्साही गरबा नृत्याने विशेष रंगत भरली. युवा गायक कल्याणी आणि महेश यांनी सादर केलेल्या सुश्राव्य भक्तिगीतांनी वातावरण प्रसन्न केले. तसेच उपस्थित प्रेक्षकांसाठी आयोजित रंजक प्रश्नमंजुषा स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी, उपजिल्हाधिकारी स्मिता मोरे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्यासह प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच गडचिरोली शहरातील नागरिक, महिला आणि युवा वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्थानिक कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.










