गडचिरोली : शालेय शिक्षण विभागाच्या ‘चला शाळेला जाऊ या’ या विशेष उपक्रमांतर्गत नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी २२ व २३ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी दुर्गम भागातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची प्रगती तसेच पायाभूत सुविधांची पाहणी केली. मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर, आष्टी यासह परिसरातील शाळांना भेट देताना त्यांनी वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे वाचन, लेखन व गणितीय कौशल्य तपासले.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींची शैक्षणिक गुणवत्ता, निवास व भोजन व्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेत त्यांनी विद्यार्थिनींशी आपुलकीने संवाद साधला. शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांची उपस्थिती, डिजिटल शिक्षण आणि भौतिक सुविधांचीही त्यांनी बारकाईने पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर नागेपल्ली (आलापल्ली) येथील सेंट फ्रान्सीस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली भव्य शैक्षणिक आढावा सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रेरक उजागरे, DIET गडचिरोलीचे प्राचार्य चापले यांच्यासह अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली व मुलचेरा या पाच तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती तसेच विविध व्यवस्थापनांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत पाचही तालुक्यांतील शैक्षणिक प्रगती, १०० टक्के पटनोंदणी, विद्यार्थ्यांची गळती रोखणे आणि शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. “दुर्गम व आदिवासी भागातील प्रत्येक घटकापर्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवणे हेच आपले मुख्य ध्येय असून, संपूर्ण पर्यवेक्षीय यंत्रणा व मुख्याध्यापकांनी समन्वयाने आणि सक्रियतेने कार्य करावे,” असे आवाहन माधुरी सावरकर यांनी केले. त्यांच्या या दौऱ्यामुळे दक्षिण गडचिरोलीतील शैक्षणिक व्यवस्थेला अधिक गती मिळण्यासोबतच शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.










