गडचिरोली : गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबरच आरोग्य आणि जनजागृतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘लोकसंवाद-२०२६’ आणि ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेश मंडळांच्या ठिकाणी सामुदायिक आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असून, नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहितीही देण्यात येणार आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व औषधोपचार : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच नगर परिषद व नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिबिरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी नागरिकांची तपासणी करणार असून रक्तदाब, मधुमेहासह आवश्यक प्राथमिक व निदानात्मक तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. गरजेनुसार औषधांचेही मोफत वितरण केले जाणार आहे.
गंभीर आजारांवरील उपचारासाठीही मार्गदर्शन : आरोग्य तपासणीदरम्यान गंभीर आजाराचे निदान झालेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध सुविधांची तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची पात्रता, लाभ आणि अर्ज करण्याची प्रक्रिया नागरिकांना समजावून सांगण्यात येणार आहे. ‘वीर योजना’बाबतही विशेष जनजागृती करण्यात येणार असून शहीद जवानांचे कुटुंबीय, माजी सैनिक, पोलीस बांधव आणि इतर पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध असलेल्या शासकीय सवलती व सहाय्याची माहिती दिली जाणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरांचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी : गणेशोत्सवाच्या काळात मंडळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असते. त्यामुळे आरोग्य तपासणी आणि शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या परिसरातील नोंदणीकृत गणेश मंडळांमध्ये आयोजित आरोग्य शिबिरांना भेट देऊन मोफत आरोग्य तपासणी व उपलब्ध आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून विविध शासकीय योजना व ‘वीर योजना’ची माहिती जाणून घेऊन पात्र नागरिकांनी संबंधित योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.









