आल्लापल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी धडकताच गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली येथे स्थानिक नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रचंड जल्लोष साजरा केला. आल्लापल्ली येथील मुख्य चौकात नागरिकांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
स्थानिक नागरिक आणि शैक्षणिक कार्यकर्त्यांच्या मते, गेल्या काही काळापासून राज्यातील व विशेषतः ग्रामीण-आदिवासी भागांतील शैक्षणिक समस्यांकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत होते. परीक्षांमधील गोंधळ, शिष्यवृत्तीतील विलंब आणि स्थानिक शैक्षणिक गरजांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे आता आगामी काळात शिक्षण खात्याच्या धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडतील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा आल्लापल्लीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी चौकात “शिक्षण व्यवस्था सुधारलीच पाहिजे” अशा घोषणाही देण्यात आल्या.










