आलापल्ली : जिल्ह्याच्या दळणवळणाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावर अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी दाखल झाले. मात्र तब्बल सहा वर्षांपासून सुरू असलेल्या दिरंगाई, निकृष्ट दर्जाचे काम आणि कथित अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी जनकल्याण समजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले आणि कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर यांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी, “गेल्या सहा वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले असून सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. केवळ पाहणी आणि आश्वासने नकोत, तर दोषी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ काम पूर्ण करा,” अशी ठाम भूमिका मांडली.
पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी तेलंगणा राज्यातून पाहणीसाठी आल्याचे समोर आल्यानंतर संतोषभाऊ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “साहेब, तुम्ही तेलंगणातून वर्षातून एकदा पाहणीसाठी येता; पण आम्ही मात्र रोज जीव मुठीत धरून या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करतो,” असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
यावेळी उपस्थित नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता येत नाही, अपघातांचा धोका कायम असतो, गर्भवती महिला व गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेणे जीवघेणे ठरत आहे, रुग्णवाहिका अडकतात, तर मालवाहतूक विस्कळीत झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची व्यथा नागरिकांनी व्यक्त केली. “हा राष्ट्रीय महामार्ग आहे की खड्ड्यांचे संग्रहालय?” असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
पाहणीनंतर अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी कामाला गती देण्यासह दर्जेदार काम करण्याचे आश्वासन दिले. मात्र गेल्या सहा वर्षांच्या अनुभवामुळे नागरिकांचा आश्वासनांवरील विश्वास उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी दिला.
तेलंगणा आणि छत्तीसगडला जोडणारा आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग हा परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र त्याची झालेली दुरवस्था विकासालाच खीळ घालत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.










