आलापल्ली / सिरोंचा : आलापल्ली–सिरोंचा या ३५३-सी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाभोवती पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुलांच्या बांधकामात तांत्रिक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केला असून, कंत्राटदार, कन्सल्टन्सी आणि संबंधित अभियंते यांच्या संगनमतातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महामार्गावरील काही पुलांच्या बांधकामात पाया मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेला ‘राफ्ट’ एका ठिकाणी टाकण्यात आला असून, त्यावरील मुख्य भिंत (वॉल) दुसऱ्याच ठिकाणी उभारली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तांत्रिकदृष्ट्या ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून, अशा प्रकारच्या कामाला मंजुरी कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये दर्जेदार काम सुनिश्चित करण्यासाठी कन्सल्टन्सी संस्था आणि सरकारी अभियंत्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, ३५३-सी महामार्गाच्या कामात मानांकन आणि डिझाइनकडे दुर्लक्ष करून कंत्राटदाराला लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याने जनतेच्या पैशांची उघड लूट सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
पहिल्याच मुसळधार पावसात या मार्गावरील काही तात्पुरते रस्ते आणि पूल वाहून गेल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता मुख्य पुलांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. भविष्यात जड वाहनांचा ताण हे पूल सहन करू शकतील का, याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.
या आरोपांमुळे ३५३-सी राष्ट्रीय महामार्गावरील कामकाजाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासन आणि संबंधित यंत्रणा याबाबत काय भूमिका घेतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










