Uncategorized

कमिशन, साखरेचे पैसे आणि धान्य वितरणाचा प्रश्न; अहेरीतील स्वस्त धान्य दुकानदारांचे निवेदन

अहेरी : सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर आज आर्थिक संकटाचे सावट गडद झाले आहे. मागील पाच महिन्यांपासून कमिशनची रक्कम न मिळाल्याने अनेक दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्या कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

 

या पार्श्वभूमीवर ‘सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना, तालुका अहेरी’च्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली (मार्फत तहसीलदार, अहेरी) यांना निवेदन सादर करून विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

 

संघटनेच्या निवेदनानुसार, मागील पाच महिन्यांपासून कमिशनची रक्कम प्रलंबित असल्यामुळे दुकानदारांना दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे. शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेची जबाबदारी पार पाडत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत दुकानदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे थकीत कमिशनची रक्कम तात्काळ वितरित करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

 

याशिवाय, जून २०२६ महिन्याचे धान्य अद्याप अनेक रेशन दुकानांमध्ये पोहोचले नसल्याने लाभार्थ्यांना धान्य वितरणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून महिन्यातील धान्य विक्रीची मुदत जुलै २०२६ पर्यंत ‘कॅरी फॉरवर्ड’ करून वाढविण्यात यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

 

निवेदनात साखर पुरवठ्याच्या गंभीर प्रश्नालाही वाचा फोडण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि जून २०२४ या कालावधीत सुमारे ४० दुकानदारांनी चलनाद्वारे साखरेसाठी रीतसर रक्कम भरली होती. मात्र, तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटूनही ना साखरेचा पुरवठा झाला, ना भरलेली रक्कम परत मिळाली. त्यामुळे संबंधित दुकानदारांना तातडीने त्यांच्या पैशांचा परतावा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पट्टीवार, सचिव तिरुपती किर्तीवार, उपाध्यक्ष पवन ताटीकोंडावार तसेच रविंद्र पुल्कुर्वार, सचिन नागुलावार, बापू दुर्गे आणि इतर पदाधिकारी व सदस्यांनी प्रशासनाला या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

 

आता जिल्हा प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिलासा मिळतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.