गडचिरोली : वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज शहरांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वैनगंगा नदीवरील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणातून २५ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी सोडण्यास बुधवार, ३ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली. या निर्णयामुळे हजारो नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागणार आहे.
गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर आणि पाणीपुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर गोसेखुर्द प्रकल्प प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत पाणी सोडण्यास मंजुरी दिली.
शहरातील पाणीसाठे धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने गडचिरोलीसह आरमोरी आणि देसाईगंज या नगर परिषदांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची दखल घेत सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून २९ मे रोजी पाणी सोडण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर गडचिरोली आणि भंडारा प्रशासनाच्या समन्वयातून प्रस्तावाला मंजुरी मिळाली.
गोसेखुर्दमधून सोडण्यात आलेले पाणी पुढील दोन दिवसांत गडचिरोलीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असून, ५ जूनपासून शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, वैनगंगा नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी नगर परिषदेकडून तात्पुरत्या माती व रेतीच्या बंधाऱ्याचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे.
गोसेखुर्द प्रकल्प प्रशासनाने ३० जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे नियोजन केले असून, नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी तसेच नदीत आवागमन करणाऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










