गडचिरोली : पेट्रोल-डिझेलच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या डिझेलची वाहतूक करणाऱ्यांविरोधात आष्टी पोलिसांनी धडक कारवाई करत १६०० लिटर डिझेल आणि ट्रॅक्टरसह एकूण ७ लाख ५८ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी किशोर विश्वजित बिस्वास (रा. देवनगर, ता. मुलचेरा) याला अटक करण्यात आली आहे.
रविवारी (दि. ३१) आष्टी पोलिसांचे पथक नियमित गस्त घालत असताना गांधीनगर येथून आनंदग्राममार्गे मुलचेराकडे जाणारा एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर संशयास्पदरीत्या ड्रम घेऊन जाताना आढळला. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता दोन लोखंडी ड्रममध्ये ४०० लिटर आणि पाच प्लास्टिक बॅरलमध्ये १,१९९ लिटर असे एकूण १,६०० लिटर डिझेल आढळून आले.
जप्त करण्यात आलेल्या डिझेलची बाजारमूल्य १ लाख ५८ हजार ७८० रुपये असून, ट्रॅक्टरची किंमत ६ लाख रुपये आहे. त्यामुळे एकूण ७ लाख ५८ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
चालक किशोर बिस्वास याच्याकडे डिझेल वाहतुकीसाठी आवश्यक परवाना किंवा संबंधित विभागाची कोणतीही वैध परवानगी नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी, हर्षवर्धन बी. जे. तसेच प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली, आष्टीचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक गोकुलदास मेश्राम व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.










