गडचिरोली : पारंपरिक भातशेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनवाढ आणि खर्चात बचत साध्य करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने वडसा तालुक्यातील तुळशी येथे खरीपपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात सगुणा भात लागवड तंत्रज्ञान (SRT), पेरणी यंत्राद्वारे भात लागवड (DSR), माती परीक्षण आणि बीज प्रक्रिया याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक शेती पद्धतींचे प्रात्यक्षिक पाहून अनेक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची तयारी दर्शविली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती प्रीती हिरळकर यांनी मार्गदर्शन करताना रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर टाळून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, हिरवळीची खते, कंपोस्ट खते आणि पीक फेरपालट यांचा वापर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
मंडळ कृषी अधिकारी पी. डी. खंडाळे यांनी सगुणा भात लागवड तंत्रज्ञानाची माहिती देताना शून्य मशागत पद्धतीमुळे वेळ, श्रम आणि खर्चात बचत होत असल्याचे सांगितले. आत्माचे बीटीएम व्ही. डी. रहांगडाले यांनी SRT पद्धतीमुळे नांगरणी, चिखलणी, रोवणी व इंधन खर्च कमी होऊन जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट केले.
सहायक कृषी अधिकारी अतुल देशमुख यांनी DSR पद्धतीची माहिती देताना चिखलणी व रोवणीचा खर्च कमी करून उत्पादनक्षमतेत वाढ करण्यास हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. तर कु. कल्पना ठाकरे यांनी माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करून संतुलित खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहून उपस्थित शेतकऱ्यांनी SRT व DSR पद्धतीबाबत विशेष उत्सुकता व्यक्त केली. तसेच लागवडीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमाला देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सुनील पारधी, संचालक मेघनाथ दुनेदार, तुळशीचे सरपंच नाकाडे, उपसरपंच सुरेश तोंडफोडे, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व्ही. डी. रहांगडाले यांनी केले, तर नितीन मुदामवार, अतुल देशमुख आणि सुरेश तोंडफोडे यांनी सहकार्य केले.










