गडचिरोली : जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या अवैध व्यापाराविरोधात जिमलगट्टा पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 10 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूचा मोठा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार जप्त करण्यात आली असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल एम. मडावी यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार एमएच-24 एएफ-1901 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा वाहनातून जिमलगट्टा ते देवलभेडा (देचलीपेठा परिसर) मार्गावर प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
माहितीची शहानिशा करताच राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अंकुश पायगन, पोलीस उपनिरीक्षक आनंद गिरे तसेच पोलीस कर्मचारी मोरेश्वर करमे, राकेश पालकूर्तीवार, रविकुमार सुन्करी, रामकिशन बडदे आणि बिप्लव किरटोनिया यांनी दोन पंचांसमक्ष जिमलगट्टा येथे सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली.
तपासणीदरम्यान वाहनातून ‘मजा 108 हुक्का शिशा तंबाखू’चे 160 डबे (किंमत 1.92 लाख रुपये) आणि ‘होला हुक्का शिशा तंबाखू’ची 40 पॅकेट्स (किंमत 80 हजार रुपये) असा एकूण 2.72 लाख रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा आढळून आला. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे 8 लाख रुपये किमतीची इनोव्हा कार जप्त करण्यात आली. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 10 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणात प्रशांत अंजय्या याडावर (वय 45), रा. वॉर्ड क्र. 12, गडचिरोली याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासात तो प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूच्या अवैध व्यापारावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशाच धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत असून, या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेते आणि तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास जिमलगट्टा पोलीस करीत आहेत.










