Editor Choice Uncategorized जिल्हा ताज्या बातम्या महाराष्ट्र शैक्षणीक

जिद्दीसमोर संकटांनी टाकली हार! रशियातून एमबीबीएस पूर्ण करत डॉ. साक्षी मद्देर्लावार यांनी साकारले डॉक्टर होण्याचे स्वप्न

गडचिरोली : स्वप्न मोठे असेल तर संकटेही मोठी असतात. मात्र, त्या संकटांवर जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मात करता येते, हे गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. साक्षी किशोर मद्देर्लावार यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. रशियातील Privolzhsky Research Medical University, Nizhny Novgorod येथून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतातील एफएमजीई (Foreign Medical Graduate Examination) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत डॉक्टर होण्याचे आपले बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आहे.

लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्रात काम करून समाजसेवा करण्याचे ध्येय त्यांनी मनाशी बाळगले होते. अशा वेळी त्यांच्या आई-वडिलांनी आणि भावाने त्यांच्यावर विश्वास ठेवत रशियात शिक्षणासाठी पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला. कुटुंबाच्या विश्वासानेच त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली.

परदेशात गेल्यानंतर भाषा, संस्कृती, हवामान आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेणे हे मोठे आव्हान होते. विशेषतः रशियन भाषा शिकणे सुरुवातीला कठीण वाटले. मात्र, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीमुळे त्यांनी रशियन भाषेवर प्रभुत्व मिळवत वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

सहा वर्षांच्या शिक्षणादरम्यान त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत दुःखद घटना घडली. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. या धक्क्याने त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. तरीही त्यांनी परिस्थितीसमोर हार न मानता वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला सावरले आणि अधिक जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. हा संघर्ष त्यांच्या यशाला अधिक प्रेरणादायी बनवणारा ठरला.

रशियातील शिक्षणाने त्यांना वैद्यकीय ज्ञानाबरोबरच शिस्त, संयम, कठोर परिश्रम आणि जागतिक दृष्टिकोन दिला. पदवीदानाचा क्षण हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला. त्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता त्या इंटर्नशिप, वैद्यकीय परवाना प्रक्रिया आणि पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी तयारी करत आहेत.

डॉ. साक्षी यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्यांचे उदाहरण आशेचा किरण ठरत आहे.

‘स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमच्याकडे चालत येईल’ — डॉ. साक्षी मद्देर्लावार

“डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी अनेक संकटांचा सामना केला. परदेशात राहून शिक्षण घेणे, कुटुंबापासून दूर राहणे आणि वडिलांच्या निधनाचा आघात सहन करणे सोपे नव्हते. पण मी कधीही हार मानली नाही. माझी आई, दिवंगत वडील आणि भाऊ यांनी दिलेला विश्वास आणि पाठिंबा हीच माझी सर्वात मोठी ताकद होती. विद्यार्थ्यांना एवढेच सांगू इच्छिते की, स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य आणि शिस्त कायम ठेवा. इतरांशी तुलना करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आजचा संघर्षच उद्याच्या यशाचा पाया असतो.”

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.