वांगेपल्ली : आदिवासी समाजाची पारंपरिक संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक असलेली पांडुम पूजा यंदाही वांगेपल्ली गावात उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडली. दरवर्षीप्रमाणे शेतीच्या कामांना प्रारंभ करण्यापूर्वी गावातील सर्व शेतकरी आणि समाजबांधव एकत्र येऊन ही पूजा करतात.
गावातील वयोवृद्धांच्या मते, पांडुम पूजा केल्यानंतरच शेतीची कामे, जसे की बीज पेरणी, रोवणी आणि इतर कृषी कार्य सुरू करण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. या परंपरेमुळे शेतीत चांगले उत्पन्न मिळते आणि गावात सुख-समृद्धी नांदते, अशी त्यांची श्रद्धा आहे.
यंदाही ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पांडुम पूजा विधीपूर्वक पार पाडत आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन केले. या निमित्ताने गावातील ज्येष्ठांनी नव्या पिढीला आपल्या पूर्वजांकडून चालत आलेल्या परंपरा, संस्कृती आणि रूढी जपण्याचे आवाहन केले.
“आपल्या पूर्वजांनी जपलेली परंपरा ही आपली ओळख आहे. ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. पांडुम पूजेच्या माध्यमातून वांगेपल्ली गावात सामाजिक एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक जतनाचा सुंदर संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.










