Uncategorized

गडचिरोलीत केंद्रीय विद्यालयाला हिरवा कंदील; ३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली : जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, येथे नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) मुख्यालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यालय प्रत्यक्ष कार्यान्वित होणार असून, सुरुवातीला इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी ही माहिती देताना, येत्या ३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय विद्यालय संघटनेने २ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे. मार्च २०१९ मध्ये देशभरातील ५० नवीन केंद्रीय विद्यालयांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी गडचिरोलीतील विद्यालय आता प्रत्यक्ष सुरू होणार आहे.

सध्या विद्यालयाची सुरुवात शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, सेमाना बायपास रोड, गडचिरोली येथे तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे. प्रायोजक प्राधिकरणाने विद्यालयासाठी आवश्यक जागा केंद्रीय विद्यालय संघटनेच्या नावे हस्तांतरित केली असून, वर्ग सुरू करण्यासाठी आवश्यक इमारतही उपलब्ध करून दिली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त वर्गखोल्या व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे.

सुरुवातीला पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असून, पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने उच्च वर्गांची भर घालण्यात येईल. प्रवेश प्रक्रिया, प्रशासकीय मंजुरी आणि इतर कायदेशीर औपचारिकता जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने वेगाने पूर्ण करण्यात येणार आहेत.

दरम्यान, तात्पुरत्या इमारतीत शैक्षणिक कामकाज सुरू असतानाच केंद्रीय विद्यालयाच्या कायमस्वरूपी भव्य इमारतीच्या बांधकामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक वातावरणाचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला नवी उभारी मिळणार असून, पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.