गडचिरोली : मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला असताना गडचिरोली पोलिसांनी वेळेशी शर्यत करत लाहेरी येथील गंभीर आजारी नागरिकाला हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. प्रशासन आणि पोलिसांच्या या धाडसी व तत्पर बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लाहेरी येथील रहिवासी श्यामसुंदर नरोटी (३५) यांची विषबाधा अथवा सर्पदंशामुळे प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. सततच्या अतिवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवणे अशक्य झाले होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलिसांनी तातडीने समन्वय साधत ‘पवन हंस’ हेलिकॉप्टर भामरागडकडे रवाना केले.
हेलिकॉप्टरद्वारे श्यामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोली येथे आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या बचाव मोहिमेत भामरागड येथील पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच पवन हंस हेलिकॉप्टरचे पायलट अरविंद सैनी आणि राजीव शर्मा यांनी मोलाची भूमिका बजावली.
दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेला बळी न पडता नागरिकांनी तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले आहे.










