क्राईम जिल्हा ताज्या बातम्या

सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांचा कट उधळला; शस्त्रे-स्फोटकांचा मोठा साठा जप्त

गडचिरोली : नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने जंगलात जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) संयुक्त कारवाईत जप्त केला. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, नव्याने स्थापन झालेल्या बंगाडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील ही महत्त्वपूर्ण यशस्वी मोहीम ठरली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे ३१ जुलै रोजी पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणहिता विशेष अभियान पथकाच्या चार तुकड्या, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि सीआरपीएफचे जवान शोधमोहिमेसाठी रवाना झाले. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी कुमनार जंगल परिसरात कसून शोधमोहीम राबविण्यात आली.

या कारवाईदरम्यान जमिनीत लपवून ठेवलेली एक एसएलआर रायफल, एक .३०३ रायफल, सात १२-बोअर रायफल, तीन सिंगल शॉट रायफल, दोन बीजीएल लाँचर्स, तीन एसएलआर मॅगझिन, एक आयईडी आणि दोन बॅटऱ्या असा मोठा शस्त्रसाठा व स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. सर्व साहित्य पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला सातत्याने यश मिळत असून, नक्षलवादी संघटना कमकुवत झाल्यानंतरही जंगलात लपवून ठेवलेली शस्त्रे व स्फोटके शोधून काढण्याची मोहीम सुरू आहे. यापूर्वी २३ मे, २७ मे, २७ जून आणि १ ऑगस्ट रोजीही अशाच प्रकारच्या कारवायांमध्ये पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, गुप्तवार्ता शाखा, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे पार पाडली. या धाडसी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी सहभागी जवानांचे कौतुक केले.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.