गडचिरोली : राज्य सरकारच्या बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “निवडणुकीपुरत्याच बहिणी लाडक्या होत्या का?” असा थेट सवाल करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रतिक्रिया देताना आत्राम म्हणाल्या की, निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला. महिलांच्या भावनांना हात घालत त्यांच्या मतांचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न झाला; मात्र निवडणूक संपताच लाखो महिलांना विविध निकषांच्या नावाखाली योजनेतून वगळण्यात आले. “हे महिलांशी केलेले आश्वासनभंग असून सरकारने त्यांच्या विश्वासाला तडा दिला आहे,” असा आरोप त्यांनी केला.
गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यातील वास्तव मांडताना त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे हजारो महिलांना ई-केवायसी (e-KYC) आणि बँक खात्यांशी आवश्यक माहिती जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही.
“ज्या गावात नेटवर्कच उपलब्ध नाही, त्या ठिकाणच्या महिलांनी ई-केवायसी करायची कशी? तांत्रिक अडचणींमुळे पात्र महिलांना लाभापासून वंचित ठेवणे हा सरळ अन्याय आहे,” असे त्या म्हणाल्या.
या पार्श्वभूमीवर भाग्यश्रीताई आत्राम यांनी सरकारकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. नेटवर्कविहीन आणि दुर्गम भागात प्रशासनाने विशेष ऑफलाइन केवायसी शिबिरे आयोजित करून प्रक्रिया पूर्ण करावी तसेच महिलांना दिलासा मिळावा यासाठी केवायसीची मुदत वाढवावी, अशी त्यांची मागणी आहे.
यासोबतच त्यांनी इशारा दिला की, “महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र भगिनीला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. अन्यथा या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
महिलांच्या हक्काच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत भाग्यश्रीताई आत्राम यांनी सरकारला थेट जाब विचारल्याने ‘लाडकी बहीण’ योजनेवरील वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.










