गडचिरोली: सिरोंचा तालुक्यातील उन्हाळी हंगामातील धानाची कापणी होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे, तरीही अद्याप शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आज मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना एक लेखी निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान आदिवासी महामंडळ उन्हाळी धान खरेदी अंतर्गत खरेदी केले जाते. मात्र, यंदा कापणी होऊन महिना उलटला तरी केंद्र सुरू न झाल्याने शेकडो शेतकऱ्यांनी आपला धान साठा उघड्यावर आणून ठेवला आहे. त्यातच आता पावसाची चाहूल लागल्यामुळे हा साठा ओला होऊन धान खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.
खाजगी व्यापाऱ्यांकडून लूट, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यास होत असलेल्या विलंबाचा गैरफायदा खाजगी व्यापारी घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाचा अधिकृत हमीभाव प्रति क्विंटल २३६९ रुपये असताना, हतबल झालेल्या शेतकऱ्यांकडून खाजगी व्यापारी १५०० ते १६०० रुपये दराने धान खरेदी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० ते ८०० रुपयांचा फटका बसत असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
वर्षभर अतोनात मेहनत करून पिकवलेल्या धानाला योग्य भाव मिळत नसल्याने, “मिया मुर्गी अंडा काया फकीर” अशी अत्यंत दयनीय आणि गरिबीची परिस्थिती सध्या शेतकऱ्यांवर ओढवली आहे.
शेतकऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान आणि संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता, प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता सिरोंचा तालुक्यातील उन्हाळी धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, अशी आर्त विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.










