Uncategorized

इन्स्टाग्रामवरील प्रेमकथेचा रक्तरंजित शेवट; लग्नाला नकार दिल्याने मित्राची हत्या

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सोशल मीडियावरून सुरू झालेल्या मैत्रीचा अत्यंत दुर्दैवी आणि रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर दोन युवकांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र लग्नाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादातून एका युवकाने दुसऱ्या युवकाची चाकूने वार करून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत युवकाचे नाव सतीशकुमार निसाद असून तो नागेपल्ली येथील रहिवासी व गॅरेज व्यवसायिक होता. तर आरोपी सूरज हलदार हा ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोघांची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. कालांतराने ही ओळख अधिक घट्ट होत प्रेमसंबंधांपर्यंत पोहोचली. दरम्यान, सतीशकुमार विवाहित असल्याची माहिती समोर आल्यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी सूरज हलदार हा सतीशकुमारला भेटण्यासाठी नागेपल्ली येथे आला होता. रविवारी पहाटे सतीशकुमार त्याला ओडिशात सोडण्यासाठी चारचाकी वाहनाने निघाला असताना देवदा गावाजवळ दोघांमध्ये तीव्र वाद झाला. या वादातून संतापलेल्या सूरजने चाकूने वार करत सतीशकुमारचा गळा चिरून खून केला. घटनेनंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाचा पुढील तपास हालेवारा पोलीस करीत आहेत.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.