Uncategorized

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघासाठी काँग्रेसचा चेहरा ठरला; शैलेश अग्रवाल यांना उमेदवारीची संधी

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने अखेर उमेदवार निश्चित केला असून वर्धा येथील उद्योगपती शैलेश अग्रवाल यांच्या नावावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एकमताने शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे. महापौर निवडणुकीनंतर एकमेकांपासून काहीसे दूर राहिलेल्या जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

चंद्रपूरमधील एका हॉटेलमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे आणि माजी मंत्री रणजित कांबळे यांची बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवारीसह निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यापूर्वी विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचे नाव चर्चेत होते. मात्र विविध राजकीय घडामोडी आणि काही तांत्रिक कारणांमुळे त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, काँग्रेसच्या काही नगरसेवकांना भाजपने आपल्या बाजूने वळविल्याच्या चर्चांमुळे पक्षाच्या संख्याबळावर परिणाम झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे उमेदवारी स्वीकारण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांमध्येही संभ्रम होता. नागपूरचे किशोर कान्हेरे यांचे नावही चर्चेत आले; मात्र त्यांनीही उमेदवारीपासून दूर राहणे पसंत केल्याचे सांगितले जाते. अखेर शैलेश अग्रवाल यांच्या नावावर सहमती झाली. विशेष म्हणजे विजय वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर आणि सुभाष धोटे यांच्यातील कथित मतभेद बाजूला ठेवून सर्व नेते एकत्र आल्याचे या बैठकीत दिसून आले. दुसरीकडे भाजपकडून अरुण लाखानी यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून या निवडणुकीत रंगतदार सामना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.