Uncategorized

नक्षलग्रस्ततेकडून औद्योगिक क्रांतीकडे! गडचिरोलीत जेएसडब्ल्यूचा भव्य स्टील प्लांट

  1. गडचिरोली : जिल्ह्याच्या औद्योगिक इतिहासात नवे पर्व सुरू करणारी महत्त्वपूर्ण घोषणा जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल यांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात तब्बल २५ दशलक्ष टन वार्षिक क्षमतेचा एकात्मिक पोलाद कारखाना उभारण्याची भव्य योजना कंपनीने आखली असून, या प्रकल्पामुळे जिल्ह्याला देशाच्या औद्योगिक नकाशावर नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना जिंदल यांनी सांगितले की, गडचिरोलीतील मुबलक लोहखनिज साठे, खाणींची जवळीक आणि गेल्या काही वर्षांत सुधारलेली सुरक्षा व्यवस्था यामुळे हा भाग स्टील उद्योगासाठी अत्यंत अनुकूल ठरत आहे. एकेकाळी नक्षलवादी चळवळीच्या प्रभावामुळे विकासापासून दूर राहिलेला हा प्रदेश आता देशातील प्रमुख स्टील उत्पादन केंद्र म्हणून उदयास येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

“लोहखनिजाच्या खाणी जवळ असल्यामुळे गडचिरोली हा स्टील उत्पादनासाठी अत्यंत धोरणात्मक जिल्हा आहे. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या भागात आता शांतता प्रस्थापित झाली असून खाणकामालाही गती मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्टील उत्पादनासाठी आवश्यक असलेली सर्व नैसर्गिक क्षमता येथे उपलब्ध आहे,” असे जिंदल यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “जेएसडब्ल्यू समूहाने गडचिरोलीत २५ दशलक्ष टन क्षमतेचा स्टील प्रकल्प उभारण्याचे वचन दिले आहे. आवश्यक खाणी आणि कच्च्या मालाची सुरक्षित उपलब्धता सुनिश्चित होताच प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात केली जाईल. त्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल.” या प्रकल्पामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो युवकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी जिंदल यांनी जेएसडब्ल्यू समूहाच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील योजनांचीही माहिती दिली. नागपूर येथे इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक बॅटरी सेल्स निर्मितीचा प्रकल्प वेगाने उभारला जात असून, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला चालना देण्यासोबतच तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील उत्पादनवाढ आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा उल्लेख करताना त्यांनी देशांतर्गत उत्पादनामुळे परकीय चलनाची मोठी बचत होत असल्याचे नमूद केले. तसेच मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्योग क्षेत्रावर काहीसा परिणाम झाला असला तरी तो तात्पुरता असल्याचा विश्वास व्यक्त करत, भारतीय उद्योगांची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने आगामी काळात भांडवली गुंतवणूक आणि औद्योगिक वाढ अधिक वेगाने होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

गडचिरोलीत प्रस्तावित हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासाला अभूतपूर्व चालना मिळण्याबरोबरच विदर्भाला देशातील नव्या औद्योगिक शक्तीकेंद्राचा दर्जा मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.