Uncategorized

घातपात की अपघात? देवदा येथील संशयास्पद मृत्यूमागील गूढ वाढले

एटापल्ली : तालुक्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील हालेवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवदा गावात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, एमएच 34 बीएफ 2560 क्रमांकाची ब्रेझा (Brezza) कार घेऊन आलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीची ओळख सतीश निसाद अशी झाल्याचे समोर आले आहे. मात्र त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीमुळे हा प्रकार अपघाताचा आहे की घातपाताचा, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हालेवरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दाबेराव यांनी सांगितले की, “या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी माहिती देता येईल.” सध्या पोलीस घटनास्थळावरील पुरावे संकलित करत असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, देवदा येथील या रहस्यमय मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण परिसराचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.