गडचिरोली : : अवघ्या १९ व्या वर्षी उद्योजकतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय पाऊल टाकत तरुण उद्योजक शाहिद शेख यांनी गडचिरोली शहरात महिंद्रा कंपनीच्या अधिकृत ‘एम. शॉपी’ स्पेअर पार्ट्स सेंटरची सुरुवात केली आहे. या आधुनिक स्पेअर पार्ट्स सेंटरचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात माजी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले.
या उद्घाटन सोहळ्याला माजी आमदार दीपकदादा आत्राम, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, तसेच महिंद्रा कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी मुकेश रॉय, रजत शर्मा आणि कपिल सुतारिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.
अवघ्या १९ वर्षांच्या वयात व्यवसाय क्षेत्रात धाडसी पाऊल उचलत शाहिद शेख यांनी सुरू केलेला हा उपक्रम गडचिरोलीतील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामीण व आदिवासीबहुल भागात आधुनिक आणि अधिकृत वाहन सेवा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शाहिद शेख यांचे अभिनंदन करत, गडचिरोलीसारख्या वाढत्या जिल्ह्यात महिंद्राच्या अधिकृत स्पेअर पार्ट्स सेंटरची गरज अधोरेखित केली. या नव्या केंद्रामुळे वाहनधारकांना दर्जेदार, अस्सल आणि विश्वासार्ह स्पेअर पार्ट्स एकाच छताखाली उपलब्ध होणार असून, वाहनांच्या देखभाल व दुरुस्तीच्या सेवाही अधिक सुलभ होणार आहेत.
महिंद्रा कंपनीच्या अधिकृत नेटवर्कमधील हे सेंटर असल्याने ग्राहकांना कंपनीमान्य दर्जाचे स्पेअर पार्ट्स, गुणवत्तेची हमी आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. त्यामुळे गडचिरोली व परिसरातील महिंद्रा वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यावसायिक, वाहनधारक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून १९ वर्षीय उद्योजक शाहिद शेख यांना शुभेच्छा दिल्या. उद्घाटनानंतर उपस्थितांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, आनंददायी आणि तरुण उद्योजकतेचा गौरव करणाऱ्या वातावरणात पार पडला.










