अहेरी : जागतिक रक्तदान दिनानिमित्त अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील सीआरपीएफ कॅम्पमध्ये बटालियन क्रमांक 37 व 9 यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला जवानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे दोन्ही बटालियनच्या कमांडंटांनी स्वतः रक्तदान करून जवानांना प्रेरणा दिली.
शिबिराचे उद्घाटन 9 बटालियनचे कमांडंट शंभू कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी 37 बटालियनचे कमांडंट दव इंजीरकन किंडो यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिराची सुरुवात कमांडंट शंभू कुमार आणि कमांडंट किंडो यांनी स्वतः रक्तदान करून केली. त्यांच्या या कृतीमुळे जवानांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि त्यानंतर 40 हून अधिक सीआरपीएफ जवानांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन, आरोग्य तपासणी आणि सुरक्षितता नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित केले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही रक्तदान करून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
रक्तदानामुळे स्थानिक रुग्णालयांतील रक्तसाठा वाढण्यास मदत होते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांना याचा मोठा लाभ होतो. त्यामुळे नागरिकांनीही नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी केले.
या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जागतिक रक्तदान दिनाचा मुख्य उद्देश असलेला ‘जीवनदानाचा संदेश’ प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला असून रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही साध्य झाले.










