Uncategorized

लाचखोरीचा वनविभागात स्फोट; वनअधिकारी, वनरक्षकांच्या भूमिकेवर संशय

गडचिरोली : जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्रात उघडकीस आलेल्या कथित लाचप्रकरणामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. एका फर्निचर व्यावसायिकाकडून कारवाईची भीती दाखवून तब्बल तीन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचत धडक कारवाई केली. यामध्ये पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना खाजगी इसम प्रदीप मंडल याला रंगेहात पकडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू, वनरक्षक नितेश मडावी आणि खाजगी इसम प्रदीप मंडल यांनी संबंधित व्यावसायिकाकडे तीन लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागणीची बाब स्पष्ट झाल्याने एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला.

त्यानुसार ठरलेल्या व्यवहारात पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, ही रक्कम स्वीकारताना प्रदीप मंडल याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून वनविभागातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू आणि वनरक्षक नितेश मडावी यांच्या भूमिकेचीही कसून चौकशी सुरू असून संपूर्ण व्यवहारामागील सूत्रधार कोण, याचा तपास एसीबीकडून करण्यात येत आहे. पुढील तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.