Uncategorized

आंतरराष्ट्रीय योग दिनी १२०० हून अधिक पोलीस अधिकारी-जवानांचा सामूहिक योगाभ्यास

गडचिरोली, दि. २१ जून : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत गडचिरोली पोलीस दलाने जिल्हाभर उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक योग शिबिरांचे आयोजन करून आरोग्य, शिस्त आणि मानसिक सुदृढतेचा संदेश दिला. पोलीस मुख्यालय गडचिरोली, पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोलीस ठाणे, उपपोस्टे आणि पोलीस मदत केंद्रांमध्ये मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला.

‘एक निरोगी पोलीस दल, सुरक्षित समाजाची हमी’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरात पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय, विशेष अभियान पथक आणि राज्य राखीव पोलीस दलातील ७०० हून अधिक अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला.

त्याचप्रमाणे प्राणहिता पोलीस उप-मुख्यालयात विशेष अभियान पथक आणि सीआरपीएफच्या सुमारे ५०० अधिकारी व जवानांनी सामूहिक योगाभ्यास करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

योग प्रशिक्षक श्री. मिलिंद उमरे आणि श्रीमती अंजली कुळमेथे यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मानसिक एकाग्रता वाढते आणि दैनंदिन कार्यक्षमतेत सकारात्मक बदल घडतो, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “व्यस्त जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने दररोज किमान २० मिनिटे योगाभ्यास करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा,” असे आवाहन केले.

या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. हर्षवर्धन बी. जे., सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत हिरडे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्यासह विविध शाखांचे अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राखीव पोलीस निरीक्षक श्री. अनुजकुमार मडामे, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. नरेंद्र पिवाल तसेच विविध शाखा, पोलीस पोस्टे, उपपोस्टे आणि पोलीस मदत केंद्रांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.