Uncategorized

अहेरीच्या आरोग्यसेवेचे स्वप्न अधांतरी; महिला-बाल रुग्णालय बंद पडण्याच्या उंबरठ्यावर

अहेरी : कुपोषण, बालमृत्यू आणि दुर्गम आरोग्यसेवेच्या समस्यांनी ग्रासलेल्या अहेरी उपविभागासाठी महिला व बाल रुग्णालय हा आशेचा किरण मानला जात होता. महाराष्ट्रातील केवळ गडचिरोली जिल्ह्यात दोन महिला-बाल रुग्णालयांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी अहेरीतील रुग्णालयासाठी सुमारे ८० कोटी रुपयांचा निधी इमारत व पायाभूत सुविधांसाठी मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पामुळे उपविभागातील हजारो महिला व बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवातीपासूनच अडथळ्यांचा सामना करावा लागला. रुग्णालयाची इमारत पूर्ण होण्यासाठी तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय सुविधा, उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची भरतीही संथ गतीने सुरू राहिली. अखेर ८ नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते रुग्णालयाचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. परंतु उद्घाटनानंतरही तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णालयाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाही.

दरम्यान, काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर आरोग्यसेवा सुरळीत होण्याची चिन्हे दिसत असतानाच आता रुग्णालय पुन्हा एका नव्या संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाढता असंतोष असल्याची चर्चा आहे. काही कर्मचाऱ्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, अपुऱ्या मनुष्यबळामुळे बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रिया आणि गंभीर रुग्णांच्या उपचारांची जबाबदारी मोजक्याच तज्ज्ञ डॉक्टरांवर पडत आहे.

विशेषतः बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची मोठी कमतरता भासत असून, काही डॉक्टरांना सलग तीन ते चार दिवस अहोरात्र सेवा द्यावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या ताणतणावाच्या परिस्थितीतही वरिष्ठांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने डॉक्टरांमध्ये नाराजी वाढत आहे. यामुळे एकामागून एक डॉक्टर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी डॉ. कन्ना मडावी यांच्या आगामी सेवानिवृत्तीमुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर एवढ्या मोठ्या रुग्णालयाची जबाबदारी कोण सांभाळणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाला जर आवश्यक डॉक्टर, मनुष्यबळ आणि सक्षम प्रशासन मिळाले नाही, तर अहेरीसह संपूर्ण उपविभागातील महिला व बालकांच्या आरोग्याच्या आशा पुन्हा एकदा धुळीस मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता शासन आणि आरोग्य विभागाने तातडीने हस्तक्षेप करून या रुग्णालयाला सक्षम नेतृत्व व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.