गडचिरोली : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी “Fit India Movement” अभियानाला बळ देण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ९व्या बटालियनतर्फे आलापल्ली–प्राणहिता परिसरात “संदेश ऑन सायकल”च्या ७५व्या आवृत्तीनिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जवानांसह नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि नियमित व्यायामाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला ९व्या बटालियनचे कमांडंट शंभू कुमार तसेच द्वितीय कमांडंट अधिकारी व्ही. वेंकट रेड्डी प्रमुख उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले. निरोगी शरीर हे सशक्त राष्ट्राचे प्रतीक असल्याचे सांगत प्रत्येकाने नियमित व्यायाम, योग आणि क्रीडा उपक्रमांना दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्य अतिथींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर जवानांनी उत्साहपूर्ण वातावरणात सायकल चालवत “फिट इंडिया, हेल्दी इंडिया”चा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. रॅलीदरम्यान परिसरात देशभक्ती, शिस्त आणि फिटनेसचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. कॅम्प परिसरातून सुरू झालेली ही रॅली विविध मार्गांवरून पुन्हा कॅम्पमध्ये येऊन संपन्न झाली.
यावेळी अधिकाऱ्यांनी फिटनेस ही केवळ वैयक्तिक आरोग्यापुरती मर्यादित नसून राष्ट्रनिर्मितीसाठीही अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. निरोगी आणि शिस्तप्रिय नागरिक देश अधिक सक्षम बनवू शकतात, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर जवान आणि अधिकाऱ्यांनी स्वतः फिट राहण्याबरोबरच समाजालाही निरोगी व जागरूक बनविण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला. सीआरपीएफ ९व्या बटालियनच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.










