Uncategorized

अहेरी पोटनिवडणुकीत आचारसंहिता भंगाचा आरोप; दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

अहेरी : अहेरी नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक ०९ मध्ये सुरू असलेल्या पोटनिवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गंभीर आरोप समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, संजय पुरुषोत्तम पोहणेकर आणि संतोष शंकराव मददीवार यांनी भाजपा उमेदवार मायाताई येल्लुरकर यांच्या नामांकन अर्ज दाखल प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित दोन्ही कर्मचारी शासनाकडून वेतन घेणारे असून त्यांनी नामांकन रॅलीत नेतृत्व करत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे.

यासोबतच, या रॅलीतील छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकद्वारे प्रसारित करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नगरपंचायत कार्यालयातील CCTV फुटेजमध्ये संबंधित कर्मचारी दिसत असल्याचा उल्लेख करत तक्रारकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी गडचिरोली, तहसीलदार अहेरी आणि पोलीस निरीक्षक अहेरी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. ही संयुक्त तक्रार रियाज मोहम्मद ताज मोहम्मद शेख, शैलेंद्र मोहनराव पटवर्धन, विलास बुधाजी सिडाम, महेश बाकेवार आणि विलास लक्ष्मण गलबले यांनी दाखल केली आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.