Uncategorized

उन्हाच्या तडाख्याने सिरोंचात ७०० वटवाघळांचा मृत्यू; पर्यावरणासमोर मोठे संकट

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे तब्बल ७०० वटवाघळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेमागील वनविभागाच्या विश्रामगृह परिसरात अनेक वर्षांपासून हजारोंच्या संख्येने वटवाघळांचे वास्तव्य आहे. दिवसभर झाडांच्या फांद्यांवर उलटे लटकून विश्रांती घेणारी ही वटवाघळे रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. मात्र, गेल्या काही दिवसांतील तीव्र उकाडा आणि वाढते तापमान सहन न झाल्याने शेकडो वटवाघळे मृत अवस्थेत झाडाखाली आढळून आली. काही वटवाघळांचे मृतदेह अजूनही झाडांवर लटकलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत वटवाघळांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून परिसरात मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, तीव्र उष्णतेमुळे वटवाघळांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. उष्माघात आणि निर्जलीकरणामुळे त्यांची शारीरिक क्षमता कमी होऊन मृत्यू ओढवू शकतो. हजारोंच्या संख्येने एकाच ठिकाणी वास्तव्यास असलेल्या वटवाघळांवर उष्णतेच्या लाटेचा अधिक गंभीर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.

वटवाघळे ही पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची प्रजाती मानली जाते. फळे, मध, परागकण आणि किटकांवर उपजीविका करणारी वटवाघळे परागीभवन, बियांचा प्रसार आणि किटक नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे जंगल संवर्धन आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान असते. जगभरात वटवाघळांच्या सुमारे १,४०० हून अधिक प्रजाती आढळतात. उष्णतेच्या वाढत्या संकटामुळे त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून वनविभागाने उर्वरित वटवाघळांसाठी परिसरात पाण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.