Uncategorized

४५ अंश तापमानात स्मार्ट कार्डसाठी प्रतीक्षा; अहेरी आगारातील अव्यवस्थेवर संताप

अहेरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी शासनाने ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य केल्याने अहेरी बस आगारात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. महिलांना ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तसेच विद्यार्थी व दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलतींसाठी आता स्मार्ट कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे कार्ड काढण्यासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागत असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

स्मार्ट कार्ड प्रक्रियेसाठी आधार लिंकिंग आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागत असल्याने प्रत्येक प्रवाशामागे १० ते १५ मिनिटांचा वेळ लागत आहे. अहेरी आगारात केवळ दोनच काउंटर सुरू असल्याने गर्दी वाढली असून कडक उन्हात तासन्‌तास उभे राहावे लागत आहे. सावली, पिण्याचे पाणी आणि बसण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेकांना चक्कर येणे व मळमळ होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातून आलेल्या आदिवासी बांधवांना ऑनलाइन प्रक्रिया करणेही कठीण जात आहे.

या समस्येवर तोडगा म्हणून अतिरिक्त काउंटर सुरू करणे, टोकन पद्धत लागू करणे तसेच गावपातळीवर विशेष शिबिरे घेण्याची मागणी प्रवासी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. आगारप्रमुखांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केल्याचे सांगत लवकरच स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले. मात्र, शासनाच्या सवलती मिळवण्यासाठी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने प्रवाशांत नाराजीचे वातावरण आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.