Uncategorized

एका मताची किंमत १० लाख? गडचिरोलीत ‘घोडेबाजार’ तेजीत

गडचिरोली / चंद्रपूर: वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच तिन्ही जिल्ह्यांत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यंदाची निवडणूक नेहमीप्रमाणेच आर्थिक ताकद, गटबाजी आणि अंकीय गणितांमुळे कमालीची चर्चेत आली आहे. दक्षिण गडचिरोलीत झालेल्या एका गुप्त बैठकीत शेजारील जिल्ह्यातील एका बड्या कंत्राटदार आमदाराने पहिल्या टप्प्यात नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोकड देण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावा एका नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. या सर्व प्रकारामुळे निवडणूक जाहीर होताच ‘घोडेबाजार’ आणि ‘पैशांच्या राजकारणा’ने विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या निवडणुकीत स्थानिक गटबाजी आणि आर्थिक समीकरणे कमालीची महत्त्वाची ठरत आहेत. या मतदारसंघात जवळपास ९७७ मतदार मतदान करणार असून, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षांपेक्षा वैयक्तिक संपर्क आणि आर्थिक लाभ देण्याच्या तयारीवर जोर दिला जात आहे. सत्ताधारी गटाकडून विरोधी गटातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांशी संपर्क साधून त्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ देण्याची तयारी दर्शवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची विधान परिषद निवडणूक पैशांच्या प्रभावावरूनच निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील कंत्राटदार किंवा श्रीमंत चेहऱ्यांना संधी दिली जात असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील काँग्रेसचे सुमारे ६० ते ७० नगरसेवक अचानक अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आल्याने काँग्रेस नेत्यांची चिंता कमालीची वाढली आहे. या सर्व नगरसेवकांना ‘आगाऊ रक्कम’ (ॲडव्हान्स) देऊन अज्ञातस्थळी पाठवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक जाहीर होताच भाजपचे स्थानिक नेते पूर्णपणे सक्रिय झाले असताना, काँग्रेसमध्ये मात्र चिंतेचे वातावरण असून अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. एकूण ९७७ मतदारांपैकी सर्वाधिक ४४४ मतदार एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत, ज्यामुळे चंद्रपूर जिल्हा या निवडणुकीचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे.

या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे २२१ तर भाजपचे १३६ नगरसेवक असल्याचे सांगितले जाते. मात्र, काँग्रेसचा एवढा मोठा गट अचानक संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याने पक्षात मोठी अस्वस्थता आणि पक्षांतराची भीती निर्माण झाली आहे. अज्ञातस्थळी गेलेल्या नगरसेवकांमध्ये चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, सावली आणि इतर काही पालिकांमधील सदस्यांचा समावेश आहे. विरोधकांनी किंवा पक्षातीलच काही नाराज नेत्यांनी फूस लावून या नगरसेवकांना हलवले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. मतदानाचा दिवस उजाडण्यापूर्वीच आपल्या मतदारांची जुळवाजुळव करणे आणि त्यांना पुन्हा एकत्र आणणे हे आता काँग्रेस नेत्यांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.